Pages

प्रजाहितदक्ष राज्यकर्ता - छत्रपती शिवाजी महाराज

परक्या मुसलमानी सत्तेच्या अंमलाखालून महाराष्ट्राला सोडवून तेथे हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच आजही प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून येतो. ४०० वर्षांपूर्वी जन्मलेल्या शिवाजी महाराजांनी आधुनिक जनताभिमुख कल्याणकारी राज्याचा पाया घातला. ते एक उत्तम प्रशासक, कुशल राज्यकर्ता, धुरंधर युद्ध निष्णात सेनापती, कुशल संघटक होते. प्रजेचे हित साधताना शासनाकडून अन्याय होऊ नये, दुष्काळातही जनतेला पुरेसे धान्य मिळावे, या दृष्टीने त्यांनी महसूल यंत्रणेची आणि कर संकलनाची नवी प्रणाली यशस्वीपणे अंमलात आणली. त्याचप्रमाणे सैन्याला रोख पगार देण्याचा नवा पायंडा पाडला. स्वराज्याच्या रक्षणासाठी सीमेवरील गड किल्ले, लष्करी ठाणे यांची सातत्याने देखभाल करणे, आवश्यक तो धान्यसाठा उपलब्ध करून देणे, तसेच सैन्याला उपयुक्त आधुनिक शस्त्रास्त्रे मिळविण्याकडे त्यांचे सदैव लक्ष असे. देशात शांतता आणि स्थैर्य असेल, तरच व्यापार उद्योग वाढीस लागून देश समृद्ध बनतो, हे जाणून स्वराज्यात नेहमी शांतता राहील, गुन्हेगारी वाढणार नाही यावर त्यांचा कटाक्ष होता. एकूणच आधुनिक आदर्श राज्यकर्त्याचे सर्व गुण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांत दिसतात.

No comments:

Post a Comment