Pages
▼
स्वातंत्र्याचा महामंत्र देणारे – लोकमान्य टिळक
महाराष्ट्राचे स्फूर्तीस्थान असणारे आणखी एक व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक. ब्रिटिश राज्यकर्त्यांनी तर त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असेच नामाभिधान दिले होते. तीव्र स्मरणशक्ती, विविधलक्ष्यी बुद्धीमत्ता, संघटन कौशल्य, भाषाप्रभुत्व, जनतेची नाडी अचूक ओळखणारा लोकनेता अशी लोकमान्यांची अनेक वैशिष्टये सांगता येतील. काँग्रेसच्या स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकमान्य टिळकांनी, त्या आधीपासूनच, ब्रिटिश सत्तेच्या विरोधात जनमत संघटित करायला सुरुवात केली होती. अतिशय जहाल विचारसरणीचा नेता म्हणून टिळक ओळखले जाऊ लागले होते. राष्ट्राच्या, पर्यायाने समाजाच्या उत्थापनासाठी राजकीय- प्रशासकीय सत्ता अत्यावश्यकच नव्हे तर अतिशय महत्त्वाची देखील आहे, हे त्यांनी ओळखले होते. म्हणूनच सामाजिक सुधारणेपूर्वी राजकीय सुधारणा करण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यांचा हा विचार किती योग्य होता हे आज आपल्याला शाहबानो आणि इतर प्रकरणातून जाणवते. लोकमान्य टिळक कुशल राजकीय नेता जसे होते, तसेच ते एक चतुर समाज शिक्षकही होते हे त्यांनी सुरु केलेल्या अनेक सामाजिक उपक्रमांतून दिसून येते. सार्वजनिक गणेशोत्सव किंवा शिवजयंती हे उपक्रम त्यांनी केवळ राजकीय विचारांच्या प्रसारणासाठीच नव्हे, तर समाजमन घडविण्यासाठी देखील वापरले. शिक्षण आणि समाज प्रबोधनावरचे त्यांचे विचार जाणून घेणे आजही उपयुक्त ठरणारे आहे.
No comments:
Post a Comment