सागरास 

ने मजसी ने परत मातृभूमीला । सागरा प्राण तळमळला 
भूमातेच्या चरणतला तुज धूतां । मी नित्य पाहिला होता 
मज वदलासी अन्य देशिं चल जाऊ । सृष्टिची विविधता पाहू 
तइं जननी-हृद् विरहशंकितहि झालें । परि तुवां वचन तिज दिधलें 
मार्गज्ञ स्वयें मीच पृष्टि वाहीन । त्वरित या परत आणीन 
विश्वसलो या तव वचनी । मी 
जगदनुभव-योगे बनुनी । मी 
तव अधिक शक्त उध्दरणी । मी 
येइन त्वरें कथुन सोडिलें तिजला । सागरा प्राण तळमळला 
शुक पंजरिं वा हरिण शिरावा पाशीं । ही फसगत झाली तैशी 
भूविरह कसा सतत साहु यापुढती । दशदिशा तमोमय होती 
गुण-सुमनें मी वेचियली ह्या भावें । कीं तिने सुगंधा घ्यावें 
जरि उध्दरणी व्यय न तिच्या हो साचा । हा व्यर्थ भार विद्येचा 
ती आम्रवृक्षवत्सलता । रे 
नवकुसुमयुता त्या सुलता । रे 
तो बाल गुलाबही आता । रे 
फुलबाग मला हाय पारखा झाला । सागरा प्राण तळमळला 
नभि नक्षत्रें बहुत एक परि प्यारा । मज भरतभूमिचा तारा 
प्रासाद इथे भव्य परी मज भारी । आईची झोपडी प्यारी 
तिजवीण नको राज्य मज प्रिय साचा । वनवास तिच्या जरि वनिंच्या 
भुलविणें व्यर्थं हें आता । रे 
बहु जिवलग गमतें चित्ता । रे 
तुज सरित्पते । जी सरिता । रे 
तद्विरहाची शपथ घालितो तुजला । सागरा प्राण तळमळला 
या फेन-मिषें हससि निर्दया कैसा । का वचन भंगिसी ऐसा 
त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीते । भिउनि का आंग्लभूमीतें 
मन्मातेला अबल म्हणुनि फसवीसी । मज विवासनातें देशी 
तरि आंग्लभूमी-भयभीता । रे 
अबला न माझिही माता । रे 
कथिल हें अगस्तिस आता । रे 
जो आचमनी एक पळीं तुज प्याला । सागरा प्राण तळमळला 

No comments:

Post a Comment