युतीचे हिंदुत्व आणि दलित

‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि हिंदुत्व विचार परस्पर विरोधी आहेत. त्यामुळे दलित नेते स्वत:च्या राजकीय स्वार्थाकरिता शिवसेना-भाजप या युतीत मिसळत आहेत,’ असा आरोप कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस करत असून आंबेडकरी जनतेच्या मनात शंका-कुशंका निर्माण करत आहेत. वास्तविक सत्तेवर येण्याकरिता किंवा सत्तेवर राहण्याकरिता कॉंग्रेस पक्षाने ज्या तडजोडी केल्या आहेत आणि आजही करत आहे त्या सर्वांचा ध्येयवाद समान होता किंवा आहे हे कॉंग्रेसने प्रथम स्पष्ट केले पाहिजे. मुस्लिम लीगचे आणि कॉंग्रेसचे ध्येयधोरण एकच अथवा समान आहे का? की दोघांचा हिंदुत्वाला विरोध ही समानता असल्याने दोघांची उद्दिष्टे समान आहेत असे म्हणावे?
इंदिराजींनी आणीबाणी लादल्यावर ती उठवण्याकरिता कम्युनिस्ट किंवा साम्यवादी आणि सोशालिस्ट किंवा समाजवादी जनसंघाबरोबर होते ना? शिवाय बुद्धिवादी असणार्‍या स्वा. सावरकरांनीदेखील गोपूजेसारख्या रूढी मानल्या नाहीत. शिवसेना हिंदुत्व मानतेे याचा अर्थ हिंदूमधील दुष्ट रूढींना ती मानते असा काढून आंबेडकर जनतेच्या मनात भय निर्माण करून राजकीय अस्पृश्यता कॉंग्रेसला निर्माण करावयाची आहे. वास्तविक शिवसेनेला जो वारसा लाभला तो प्रबोधनकार ठाकरे यांचा आहे. ते किती प्रगत विचारांचे होते हे जुन्या पिढीला माहीत आहे. पण आंबेडकरी जनतेच्या नव्या पिढीला ते माहीत नसल्याने त्यांचा ग्रंथ ‘माझी जीवनगाथा’, जो विविध ग्रंथालयांत उपलब्ध आहे, तो एकदा सर्वांनी वाचावा आणि कॉंग्रेसवाल्यांना आणि त्यांच्या ‘राष्ट्रवादी’ मित्रांना विनोबांचाच डोस पाजा. त्यांनी त्या गीताईत अनुवाद केला आहे ‘‘नेणत्या कर्मनिष्ठांचा बुद्धिभेद करू नये’’ आणि त्यांना बजावा की आता आम्हाला भडकविणे किंवा बहकविणे आपणास शक्य होणार नाही. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांचे संयुक्त महाराष्ट्र निर्मितीतील योगदान कोणीही नाकारू शकत नाही. त्यांची पददलितांबद्दलची कणव कॉंग्रेससारखी दिखाऊपणाची नाही. त्याचा इतिहासच साक्षी आहे.
आजच्या कॉंग्रेसी विचारांचे जनक गांधीजी आहेत. त्यांचे आंबेडकरांशी कितपत जमले होते? त्याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे धर्माच्या आधारावर पाकिस्तान मान्य करताना त्याची तार्किक आणि व्यावहारिक बाजू डॉ. आंबेडकरांनी मांडली होती, ती ही होती की लोकसंख्येची आदलाबदल करा, ती केली असती तर आजचा कश्मीरपासून अयोध्यापर्यंत कोणताच प्रश्‍न राहिला नसता आणि वारंवार होणारे जातीय दंगे टाळता आले असते व शिवाय पाकप्रेमी मुसलमानांची घरे हिंदू निर्वासितांना मिळाली असती. पण धर्माच्या नावावर राष्ट्रद्रोही मुस्लिमांना राष्ट्र फोडून द्यायचे, अन् हिंदूंपुढे मात्र सर्वधर्मसमभावाच्या आणि निधर्माच्या गप्पा मारावयाच्या हे कॉंग्रेसचे धोरण राहिले. माझा आक्षेप हा आहे की, कॉंग्रेसने तर्कशुद्ध विचाराने देशविभाजन केले नाही. मुस्लिमांना पाकिस्तान देताना मुस्लिम धर्माधिष्ठित राज्य तयार केले, पण त्या तत्त्वानुसार उरलेल्या हिंदुस्थानास मुस्लिमेतर राष्ट्र न म्हणता पुन्हा येथे मुस्लिमांना ठेवून घेतले. म्हणून बाबासाहेबांचा तर्काधिष्ठित विचार कॉंग्रेसने मानलेला नाही. दुसरे असे की, जर हे मुस्लिमेतर राष्ट्र घोषित झाले असते तर मुस्लिमांची डोकेदुखी (उदाहरणार्थ, कश्मीर, अयोध्या प्रश्‍न, दंगेधोपे इत्यादी) राहिली नसती किंवा ‘लोकसंख्येच्या अदलाबदलीस येथील मुस्लिमांचा विरोध होऊन ते येथे हिंदूंशी सहकार्याने राहिले असते. तात्पर्य डॉ. आंबेडकरांना विरोध करून त्यांना निवडणुकीत पराभूत करणारी कॉंग्रेस आज त्यांच्याबद्दल प्रेमाच्या उमाळ्याने बोलत आहे. शंभर उंदीर खाऊन अहिंसेचे गोडवे गाणार्‍या मांजरीप्रमाणे ते करीत आहेत.
स्वा. सावरकरांना देशविभाजन नको होते व त्यांनी त्यास सतत विरोधच केला, पण जेव्हा ते अटळ दिसू लागले त्यावेळी त्यांनीही आंबेडकरांप्रमाणे लोकसंख्येची अदलाबदल करण्याचे सुचवले. अस्पृश्यता नष्ट करण्याकरिता सहभोजन, मंदिरात सर्वांस प्रवेश इत्यादी कार्यक्रम केले. याचा अर्थ आंबेडकरी जनता आणि हिंदुत्ववादी जनता एकत्र येऊ शकते. डॉ. आंबेडकर आणि कॉंग्रेस यांच्यात विळ्याभोपळ्याचे नाते गांधीयुगात होते. त्याचे काही संदर्भ मी येथे देतो.
गांधीजींना त्यांनी शत्रू का मानले? गोल्मेज परिषदेत डॉ. आंबेडकरांना विरोध करताना गांधींनी म्हटले की, डॉ. आंबेडकर हिंदुस्थानातील सर्व अस्पृश्यांच्या प्रतिनिधित्वाचा जो हक्क सांगत आहेत तो रास्त नाही, हे विधान माझी जबाबदारी पूर्णपणे ओळखून मी करतो आहे. अस्पृश्यांच्या खास प्रतिनिधित्वाने हिंदूंत फूट होईल. त्यामुळे कोणाचीही खास समाधानकारक परिस्थिती उत्पन्न होईल, असे मला वाटत नाही. अस्पृश्य धर्मांतराने मुसलमान किंवा ख्रिश्‍चन झाले तरी चालतील, परंतु खास प्रतिनिधित्वाने एकाच खेड्यात दुफळी करून हिंदू समाजाचे भिन्न स्वरूप मला खपणार नाही (स्वराज्य शिष्टाई अनुवादक गंभा निरंतर पृ. ४४).
याचा अर्थ गोलमेज परिषदेत गांधीजींनी डॉ. आंबेडकरांना अस्पृश्यांचा प्रतिनिधी मानण्यास नकार देऊन एक प्रकारे अपमानच केला आणि धर्मांतर करण्याचे आव्हान दिले. याउलट डॉ. आंबेडकरांना स्वा. सावरकर यांनी आवाहन केले. सवर्णांनी दलितांच्या पूर्वजांवर अन्याय केला तो आता धुऊन काढला पाहिजे. पण सवर्ण आणि दलित यांच्यावर आक्रमण करणार्‍या शत्रूकडे त्या अन्यायाचे परिमार्जन करण्याकरता त्यांनी वळणे योग्य ठरत नाही. केवळ हरिजन हे नामांतर करून तो कलंक धुतला जाणार नाही, तर ती चार वर्णांची कालबाह्य झालेली समाजव्यवस्था नष्ट केली पाहिजे. गांधीजी त्या कालबाह्य व्यवस्थेचे समर्थक होते. शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांनीही कालबाह्य झालेल्या आणि जाता जात नसणार्‍या जातींना राजकारणातून घालवण्याचा जो प्रयत्न केला तो संत गाडगेबाबांच्या विचारात बसणारा आहे. त्या संताने गरीब-दरिद्री ब्राह्मणालादेखील मदत केल्याचे त्यांच्या चरित्रावरून दिसते.
शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रावर होणार्‍या अन्यायावर जेव्हा बोलत होते आणि काही बाबतीत जनसंघाला विरोध करत होते तेव्हा कॉंग्रेसला त्यांच्याशी जवळीक करावीशी वाटे, पण त्यांना हे कळले नाही की दिल्लीचे तख्त राखणारा नि पानीपतला धारातीर्थी पडणारा मराठी माणूस प्रथम राष्ट्रनिष्ठ असतो आणि मग प्रांतनिष्ठ किंवा जातीनिष्ठ असतो. कॉंग्रेसमधील मराठी माणसांना हे नामंजूर असेल. त्यांना इटालियन नेतृत्वही चालेल, पण आठवलेप्रणीत आंबेडकरी जनतेला आता ते चालणार नाही.
- डॉ. वि. वा. देशपांडे

स्तंभलेख, सामना

No comments:

Post a Comment