आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके- देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया; विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया, दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके
सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके; पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया - सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या; फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके!
शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे? पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते? ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे; ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते!
No comments:
Post a Comment