केवल जीवनतारे - सकाळ वृत्तसेवा
Thursday, December 06, 2012 AT 03:15 AM (IST)
नागपूर - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाने साऱ्या समाजाला हेलावून सोडले होते. सात कोटी अस्पृश्यांना युगायुगाचं देणं देऊन बाबासाहेब गेल्याच्या दुःखाने 56 वर्षांनंतरही मन दाटून येते. त्यावेळी तर कुणी "दलितांचा वाली गेला', तर कुणी "आकाशातील दिव्य तारा हरपला' अशा शब्दांत संवेदना व्यक्त करीत होता. समुद्रतीरावर बाबासाहेबांना "चिते'वर बघणे सहनच होत नव्हते. प्रत्येक डोळ्यांतून अश्रूंचा महापूर वाहत होता. समुद्रतीरावर अश्रूंचे सिंचन झाले होते. दुःख भरलेल्या या प्रसंगाचा "आँखो देखा हाल' रेडिओवरून जनमानसांपर्यंत पोहोचवण्याचे काम ख्यातनाम मराठी साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी केले होते.
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाला ज्यांना जाता आले नाही, प्रत्यक्ष अंत्ययात्रेत सहभागी होता आले नाही, त्यांनी रेडिओवरून हा वृत्तांत ऐकून तो गहिवरलेला क्षण अनुभवला. हिंदू कॉलनीतील राजगृहावरून निघालेल्या बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचा संपूर्ण वृत्तांत रेडिओवरून सांगितला जात होता. रेडिओजवळ मिळणारी माहिती ऐकताना मन भरून येत होतं. डोळ्यांतील आसवे थांबवता येत नव्हती. मोठ्या प्रमाणात कडेवर लेकरू घेऊन महिला या अंत्ययात्रेत सामील झाल्या होत्या. कुणाच्या खांद्यावर, तर कुणाच्या डोक्यावर गाठोडं होतं आणि डोळ्यांतून अश्रू वाहात होते. मनगटाने तर कोणी धोतराच्या सोंग्यान अश्रू पुसत बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेत चालत होता. धिम्या गतीनं सजवलेला ट्रक पुढे सरकत होता आणि गर्दीतून फुलांचा वर्षावर सुरू होता...
हा सारा वृत्तांत नभोवाणीवरून पु. ल. देशपांडे यांनी सांगितला. या अंत्ययात्रेत तत्कालीन मागास खात्याचे मंत्री तपासे, सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री नाईक-निंबाळकर, उपमंत्री भ. दा. देशमुख, मधू दंडवते, मधुकर महाजन, भिडे, आचार्य प्र. के. अत्रे यांच्यासह बडे नेते सहभागी झाले होते. सिलोनवरून भदन्त आनंद कौसल्यायन, भिक्खू एन. पन्नाकारा, भिक्खू के. धम्मानंद महापरिनिर्वाणाला आले होते. बाबासाहेबांचा पार्थिवदेह दिल्लीवरून मुंबईला आणताना मध्यरात्र उलटून गेली होती; परंतु थंडीत कुडकुडत कुणी कंदील, कुणी गॅसबत्ती तर कुणी रॉकेलची दिवटी घेऊन राजगृहासमोर उभे होते. बाबासाहेब यापुढे दिसणार नाहीत म्हणून अखेरचे दर्शन घेण्यासाठी जगभरातून लोकं आले होते. बाबासाहेबांच्या चितेच्या ज्वाळा निघत होत्या, आणि सारा समाज ओक्साबोक्सी रडत मूकवंदना देत होता. 16 डिसेंबरला धम्मदीक्षा सोहळा बाबासाहेबांच्या उपस्थितीत होणार होता; परंतु बाबासाहेबांचे निर्वाण झाल्याने त्यांची इच्छा अपूर्णच राहिली. ही इच्छा कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी बाबासाहेबांच्या चितेला साक्षी ठेवून पूर्ण केली. अंत्यसंस्कारात सहभागी लाखो-लाखो जनसमुदायाला "बुद्धं शरण: गच्छामि' आणि 22 प्रतिज्ञा देऊन दीक्षा सोहळ्याने अभिवादन केले, या इतिहासाची नोंदही "चंदनाला पुसा' येथे आहे, हे विशेष.
आचार्य अत्रे यांची शोकसंवेदना
"दलितांचे राज्य स्थापन करण्याअगोदरच निघून गेले बाबासाहेब', असे म्हणत मुंबईचे महापौर मिरजकर अक्षरशः रडले होते. आचार्य. प्र. के. अत्रे यांनी, "मृत्यूलाच मृत्यूची किव वाटू लागली. मरणाने आज आपलेच हसू करून घेतले.' अशा शब्दात शोकसंवेदना व्यक्त केली होती. अत्रेंचा शब्दन्शब्द उपस्थितांच्या काळजाला भिडत होता.
No comments:
Post a Comment