Pages

वक्ता दशसहस्रेषु

दिव्यमराठी
डॉ.नरेंद्र जाधव | Nov 24, 2012, 22:18PM IST




डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणांचा अभ्यास करत असताना तत्कालीन परिस्थिती डोळ्यांसमोर उभी राहते. बाबासाहेबांच्या ओजस वाणीतून प्रकटलेला प्रत्येक बोल-शब्दन्शब्द-क्रांतिकारी आहे. लौकिकदृष्ट्या
डॉ. आंबेडकरांच्या भाषणाच्या शैलीची वेगवेगळी वैशिष्ट्ये सांगता येतील. अनुयायी प्रबोधन करताना कधी मातृहृदयी ममता तर कधी पितृतुल्य दिशादर्शन करणारे डॉ. आंबेडकर तुमच्या-आमच्यासाठी बाबासाहेब कसे झाले हे उमगते. स्वत:वरील सामंजस्यपूर्ण टीकेला कधी खिलाडू वृत्तीने घेणारे बाबासाहेब कधी-कधी विरोधकांना एखाद्या मल्लासारखे आव्हान देताना दिसतात. शब्दाला कृतीचे सामर्थ्य दिल्यामुळे आंबेडकरांची भाषणे दीर्घकाल प्रभाव पाडणारी ठरतात.

बाबासाहेबांच्या प्रत्येक भाषणामध्ये मूलगामी चिंतनातून प्रकटलेले विचार ठासून भरलेले आहेत. त्यांची भाषाशैली ही निश्चितच प्रेरणादायी आहे. बाबासाहेब स्वत: प्रकांडपंडित असले तरी त्यांनी आपल्या विद्वत्तेचे प्रदर्शन कधी मांडले नाही. त्यांच्या चरणी भक्तिभावाने लीन होणा-या दलित समाजासाठी बाबासाहेबांनी नेहमीच प्रेरक विचार त्यांना समजतील अशा सोप्या भाषेत मांडले. त्यातील कार्यकारणभाव लक्षात घेण्यासाठी त्यांच्या भाषेचे सौंदर्य अभ्यासले पाहिजे.
मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती अशा चार भाषा त्यांना अवगत होत्या (जर्मन आणि फ्रेंच भाषा शिकण्याचादेखील त्यांनी प्रयत्न केला होता). इंग्रजी आणि मराठी भाषांवर

डॉ.आंबेडकरांचे असामान्य प्रभुत्व होते. त्यांच्या इंग्रजी भाषेत तर्कशुद्ध धारदारपणा तर होताच, शिवाय अफाट व्यासंगातून आलेली व्यापकता आणि प्रगल्भतादेखील होती. प्रमाण मराठी भाषेवर आणि बोलीभाषेतील मराठीवर तर त्यांची पकड विलक्षण म्हणावी अशा स्वरूपाची दिसते. आपले विद्वत्तापूर्ण विचार अगदी तर्कशुद्ध आणि तरीही मराठीचा रसाळ गोडवा कायम ठेवून मांडणारा असा वक्ता पुन्हा होणे नाही. संस्कृत शिकता आली नाही याची खंत बाबासाहेबांनी कधीकाळी व्यक्त केली असली तरी त्यांच्या भाषणांमध्ये संस्कृत भाषेतील सुभाषितांचा समर्पक समावेश असे. पाल्हाळीक भाषेपेक्षा मोजक्याच शब्दांत समुदायाला मंत्रमुग्ध करून कार्यप्रवण करण्याचे जे सामर्थ्य फारच कमी नेत्यांना लाभते, ते बाबासाहेबांना लाभले होते. म्हणूनच तर बाबासाहेब हे सर्वार्थाने लोकनेते (मास लीडर) होते. एखाद्या छोट्या समूहाचे अथवा गटाचे नेते नव्हते. तेजोनिधी बाबासाहेबांच्या कार्यकर्तृत्वामुळे त्यांच्या विरोधातील काही नेत्यांनी त्यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. त्याला तितक्याच किंबहुना अधिक कठोर शब्दांत बाबासाहेबांनी प्रत्युत्तर दिले होते. ‘कुठे मी हिमालय व कुठे हे मुतखडे...’, असे संबोधून बाबासाहेबांनी विरोधकांना पळता भुई थोडी केली होती. कित्येकदा आपल्यावर झालेल्या टीकेला नर्मविनोदी शैलीत उत्तर देऊन त्यांनी वातावरणातला ताण सहजगत्या दूर केलेला दिसतो. बाबासाहेबांना भजी फार आवडत असत. त्यामुळे त्यांच्यावर ते एका बैठकीत दोन शेर भजी खातात, अशी टीका केली गेली होती. आता या टीकेला त्यांच्या लेखी कितीसे महत्त्व असणार? तरीही त्यांनी या टीकेचाच वापर करून भाषणात हशा पिकवला. ते म्हणतात, ‘आता दोन शेर भजी खाल्ल्याने माझ्या नैतिकतेवर काही विपरीत परिणाम होणार आहे काय?’ बाबासाहेबांच्या भाषाशैलीला नर्म विनोदाची झालर असली तरी त्यामागे सामाजिक विषण्णतादेखील दडलेली होती.

गंभीर विषयाची मांडणी करताना बाबासाहेब श्रोत्यांच्या सहज आकलनासाठी रोजच्या जगण्यातील उदाहरणे देत असत. अस्पृश्यता नष्ट करणे म्हणजे विषाचे अमृत करता येण्यासारखे आहे. हिंदू धर्मात राहून ते अजिबात शक्य नाही, असे प्रतिपादन करताना बाबासाहेब आंबेडकरांनी स्वयंपाकघरातील उदाहरण दिले आहे. तेही स्वत:च्या पाककलेचे कौशल्य अधोरेखित करत. ते म्हणतात, ‘...विषाचे अमृत होणेच शक्य नाही. पदार्थ खारट झाला तर तो अळणी करता येईल, आंबट झाला तर तो गोड करता येईल, पण विषाचे अमृत करता येणे अशक्य आहे. मी स्वत: स्वयंपाक करण्यास शिकलो आहे. मला कोणाही भगिनीइतका चांगला स्वयंपाक करता येतो. तुम्हाला कदाचित माहीत नसेल, पण काही धंदा न मिळाल्यास बावर्ची तरी होता यावे म्हणून मी स्वयंपाक करण्याचे काम शिकलो आहे. एखादा पदार्थ खारट झाला तर त्यातले मीठ कसे काढावे हे ज्या भगिनींना माहीत नसेल त्यांना मी त्याची युक्ती सांगून ठेवतो. पान 4 पाहा
खारट पदार्थ शिजत असताना त्यात एक कागदाचा तुकडा टाकून ठेवावा, म्हणजे तो पदार्थ अळणी होतो. सांगण्याचे तात्पर्य इतकेच की सर्व काही बदलता येईल, पण विषाचे अमृत होणार नाही.ह्ण बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माचा तिटकारा होता. पण हिंदू धर्माचे तत्त्वज्ञान ज्या भाषेत उपलब्ध आहे त्या संस्कृत भाषेविषयी बाबासाहेबांना जिव्हाळा, प्रेम होते. कदाचित ती भाषा शिकू न शकल्याची खंतही असेल; पण बाबासाहेब अनेकदा संस्कृतमधील सुभाषिते प्रसंगानुरूप, कालानुरूप उद्धृत करत असत.

एके ठिकाणी तर हिंदू धर्माची व्याख्या मांडताना त्यांची वि. दा. सावरकर व लोकमान्य टिळक यांनी या संदर्भात वापरलेली सुभाषिते उद्धृत केली. सावरकरांनी सांगितलेले ह्यआसिंधु: सिंधुपर्यंता यस्य भारत भूमिका! पितृभुभु: पुण्यभुश्चैव सवै हिंदु: इति इच्यते!! व टिळकांनी मांडलेल्या ह्यप्रामाण्य बुद्धिर्वेदषु साधनानाम अनेकता उपास्य नाम नियम:ह्ण ही दोन्ही सुभाषिते मांडताना हिंदू धर्मातील दोष तर बाबासाहेबांनी दाखवून दिले खरे; पण त्याबरोबरच बौद्ध धम्माचा विचारदेखील श्रोत्यांवर बिंबवला. उत्कृष्ट वक्त्याचे हेच पहिले लक्षण असते. म्हणजे इतरांचे दोष दाखवून देताना गुणवत्तापूर्ण पर्याय देणे हेसुद्धा एक वेगळेच कौशल्य आहे. या भाषणात बौद्ध धम्म समजावून सांगताना बाबासाहेबांनी काही नेमक्या शब्दांचा वापर केला. तो म्हणजे- बहुजनहिताय, बहुजनसुखाय, लोकानुकंपाय, हिताय, सुखाय, देव मनुस्सान, धम्म आदी कल्याणं, मध्य कल्याणं, अति कल्याणं... संदर्भपूर्ण विषयाची मांडणी करण्यात बाबासाहेबांचा किती हातखंडा होता हेच यावरून लक्षात येते. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मावर, धर्मग्रंथांवर अनेक आघात केले. परंतु धर्मातील दोष दाखवणा-या परंतु हिंदू धर्माच्याच संरचनेचा एक भाग असलेल्या काही ग्रंथांमधील कवने बाबासाहेबांनी अनेकदा भाषणांमध्ये वापरली आहेत.

जशी की-दया तिचे नाव, भूतांचे पाळण। आणिक निर्दाळन कंटकांचे।। विशेषत: बाबासाहेब आंबेडकरांनी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या क्रांतिकारी अभंगांचा अनेकदा दाखला दिला आहे. एखाद्या कीर्तनकाराप्रमाणे दृष्टांत देताना अनुरूप कथांचा वापरदेखील बाबासाहेबांच्या भाषणांमध्ये आढळतो. प्रारंभीच्या काळात रामायण, महाभारताप्रमाणे इसापनीतीतल्या कथा आढळतात. जसजसा बाबासाहेब आंबेडकरांचा प्रवास बोधिसत्त्वाच्या मार्गावरून सुरू झाला तसतशा जातक कथादेखील बाबासाहेबांच्या भाषणात येऊ लागल्या. मिलिंदच्या कथा, भगवान गौतम बुद्धाच्या कथा सांगून बाबासाहेब व्यापक अर्थाने बौद्ध धर्माचे प्रवचनकारच झाले. बाबासाहेबांच्या प्रासादिक वाणीमुळेच त्यांचा प्रत्येक शब्द त्यांच्या कोट्यवधी अनुयायांना कार्यप्रवण करणारा ठरला. त्यामागचा कार्यकारणभाव अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी एकवटलेली निष्ठा हाच होता. एक मात्र नक्की, बाबासाहेबांनी भाषणांमध्ये कधीही व्यक्तिगत आकस व्यक्त केला नाही. त्या काळी सर्वमान्य असलेल्या सामाजिक नेत्यांवर बाबासाहेबांनी जोरदार टीका केली आहे. भारताने ज्यांना महात्मापण बहाल केले त्या गांधीजींवरदेखील बाबासाहेबांनी वेळोवेळी टीका केल्याचे आढळते. परंतु ही टीका कधीही वैयक्तिक स्वरूपाची नव्हती. तत्त्वांशी असलेले मतभेद त्याच भाषेत बाबासाहेबांनी व्यक्त केले. त्यामुळे एखाद्या व्यक्तीशी त्यांचे मतभेद होते, असे म्हणता येईल, पण वैर होते असे कदापि म्हणता येणार नाही. त्यामुळे एखाद्या नेत्यासमवेत त्यांचे वैचारिक मतभेद वैयक्तिक वैर म्हणून रंगवणा-यांनी बाबासाहेबांची भाषणे नव्याने अभ्यासावीत. ही 500 भाषणे वाचल्यानंतर वाचकांना डॉ. आंबेडकरांची केवळ वैचारिक उत्क्रांतीच नव्हे तर त्यांच्या जीवनाची विकसित होत गेलेली दिशादेखील समजून घेण्यास मदत होईल.

No comments:

Post a Comment