‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ असे बजावणारे - स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर

प्रखरबुद्धिवादी, जहाल देशभक्त बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकर यांचे नाव माहित नाही अशी व्यक्ती सहसा आढळणार नाही. ब्रिटिशांच्या जोखडातून भारतभूमीला सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने सोडविण्याची व त्यासाठी प्रसंगी मृत्यूही पत्करण्याची घोर प्रतिज्ञा वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षीच सावरकरांनी केली होती. नाशिक जिल्ह्यातील भगूर येथील प्रतिष्ठित सावरकर कुटुंबात २८ मे १८८३ रोजी जन्मलेले विनायक दामोदर सावरकर निकटवर्तीयांत तात्याराव नावाने परिचित होते. पुण्यात महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच तात्यारावांचे वक्तृत्व आणि नेतृत्व गुण यशस्वीरीत्या प्रकट झाले. लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत पुणे येथे ‘विदेशी कपड्यांची होळी’ करून तात्यारावांनी ब्रिटिश सत्तेविरुद्धचा आपला रोष व्यक्त केला होता. ब्रिटिशांच्या भांडवलशाही शोषणाचा तसेच ‘फोडा व झोडा’ प्रवृतीच्या शासनाचा निषेध करण्यासाठी केलेली विदेशी मालाची ही देशातील पहिलीच होळी होती.
ब्रिटिशांच्या निशाणावर तात्याराव फार पूर्वीपासूनच म्हणजे नाशिकमध्ये असल्यापासूनच होते. कारण त्यांनी आपले वडील बंधू बाबाराव सावरकर आणि मित्र कवी गोविंद यांच्या सहकार्याने ‘मित्रमेळा’ नावाची संघटना स्थापन करून राष्ट्रभक्तीपर विचार जागृती करण्यास सुरुवात केली होती.तात्याराव १९०६ मध्ये वकिलीची तत्कालीन सर्वोच्च पदवी – ‘बॅरिस्टर’ चा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला रवाना झाले. त्यावेळी ‘मित्रमेळा’ चे नाव ‘अभिनव भारत’ झाले. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांनी इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी चे आत्मचरित्र मराठीत अनुवादित केले, पुढे हे पुस्तक भारतातील बहुसंख्य क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान ठरले. तात्याराव सावरकरांची जहाल आणि राष्ट्रवादी विचारणी तसेच सशस्त्र क्रांतीला असणारा संपूर्ण पाठिंबा यामुळे ब्रिटिशांनी त्यांना विविध आरोपाखाली १९१० साली इंग्लंडमध्येच अटक करून ‘काळ्यापाण्याची’अर्थात जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि त्यांची अंदमानला रवानगी केली. बोटीच्या या प्रवासातली फ्रान्सच्या किनाऱ्या नजिकची, मार्सेलिसची, बोटीवरून समुद्रात घेतलेली उडी अतिशय गाजली व आजही ती अनेकांचे स्फूर्तीस्थान आहे.
अंदमानातील कारावासात सावरकरांनी ‘कमला’ हे खंडकाव्य लिहिले. तेथून त्यांची सशर्त सुटका झाल्यानंतर ते रत्नागिरीत वास्तव्यास आले. येथे त्यांच्या राजकारण विरहित समाजकार्यास सुरुवात झाली. मात्र ‘हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व’ या मताचा त्यांनी सतत पुरस्कार केला.त्यातूनच त्यांचा द्वि-राष्ट्र सिद्धांत निर्माण झाला. त्यांचा हा सिद्धांत किती मौलिक होता हे आज पदोपदी जाणवते. सावरकरांचे लेखन राजकीय असो वा सामाजिक, ते अतिशय तर्कशुद्ध आणि बुद्धीप्रामाण्यवादी होते. त्यांचे विचारही सहजासहजी समाजाच्याच नव्हे तर विचारवंत म्हटल्या जाणाऱ्यांच्याही पचनी न पडणारे होते. त्यांची भाषाशुद्धीची चळवळ देखील मराठी साहित्याचा एक आगळा पैलू ठरली आहे. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र सावरकर काहीसे राजकारण, साहित्यकारण यातून बाजूला पडल्यासारखे झाले.

No comments:

Post a Comment