‘श्री गुरुजी’ माधव सदाशिव गोळवलकर

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (रा. स्व. संघ) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्यानंतरचे दुसरे सरसंघचालक म्हणजे माधव सदाशिव गोळवलकर अर्थात परम पूज्य श्री गुरुजी. हिंदुत्ववादी स्वातंत्र्यसेनानी पं.मदनमोहन मालवीय यांनी स्थापन केलेल्या बनारस हिंदू विद्यापीठातून गोळवलकर यांनी प्राणीशास्त्रात (झूलॉजी) प्रथम श्रेणीत एम.एस्सी. ची पदवी संपादन केली. ते वर्ष होते १९२८. त्यानंतर त्यांनी सागरी जीवन या विषयात पीएच. डी. च्या पदवीसाठी प्रबंध लिहिण्यास सुरुवात केली होती, पण मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या माधवराव गोळवलकरांना आर्थिक कारणांमुळे तो पूर्णत्वास नेता आला नाही.
वस्तुतः नागपूरजवळच्या रामटेक येथील शिक्षक पित्याच्या पोटी जन्मलेले माधवराव गोळवलकर लहानपणापासूनच अतिशय हुषार विद्यार्थी होते. प्राथमिक शाळेत असतानाच त्यांनी संपूर्ण शेक्सपियर वाचला होता. पण एम. एस्सी. नंतरचे शिक्षण पूर्ण न करता आल्याने त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठातच शिक्षकाची नोकरी पत्करली. येथेच ते ‘गोळवलकर गुरुजी’ अथवा ‘श्रीगुरुजी’ – झाले. पुढे नागपूर विद्यापीठातून १९३५ मध्ये कायद्याची पदवी देखील मिळवली. याच सुमारास ते प्रथम रामकृष्ण मिशनच्या आणि नंतर रा.स्व.संघाच्या संपर्कात आले. बनारस हिंदू विद्यापीठाचे विद्यार्थी आणि संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांचे निकटवर्ती भय्याजी दाणी यांनी नागपुरात संघाची शाखा सुरु केली आणि गोळवलकर त्यात सामील ते कायमचेच.
कालांतराने गोळवलकरांची डॉ. हेडगेवारांशी भेट झाली आणि डॉक्टरांच्या प्रेरणेने ते संघकार्यात अधिक सक्रीय झाले. संघाच्या सरकार्यवाहपदी गोळवलकर गुरुजींची १९३९ मध्ये नियुक्ती करण्यात आली. दुर्दैवाने डॉ. हेडगेवार यांचा २१ जून १९४० रोजी स्वर्गवास झाला. आणि त्यांचे उत्तराधिकारी म्हणून श्रीगुरुजींची सरसंघचालकपदी निवड करण्यात आली. स्वतः डॉ. हेडगेवारांनीच मृत्युपूर्वी एका पत्रात तशी इच्छा लिहून ठेवली होती. सुमारे २७ वर्षे श्रीगुरुजींनी संघाची धुरा वाहिली. या प्रदीर्घ काळात त्यांनी संघाचे ‘हिंदूंची सामाजिक – सांस्कृतिक संघटना’ हे स्वरूप व्यापक केले. समाजजीवनाच्या अनेकविध क्षेत्रात त्यांनी एक विचाराने काम करणाऱ्या संस्था उभारल्या. ‘संघ परिवार’ हीच आज या सर्व संस्थांची सामुहिक ओळख आहे. भारत हे हिंदू राष्ट्र आहे आणि येथील सर्व नागरिक हिंधू धर्माचे पालन, किमान आदर करणारे असावेत या आग्रही मताचे श्रीगुरुजी होते. त्यांनी लिहिलेल्या ‘वुई ऑर अवर नेशन डिफाइनड’ या ग्रंथात याच मताचा हिरीरीने पुरस्कार करण्यात आला आहे. त्यांच्या या विचारामुळे त्यांच्यावर आजही विरोधकांकडून कडवट टीका केली जाते. ‘बंच ऑफ थॉट्स‘ या पुस्तकात देखील त्यांनी याच विचारांचे आग्रही प्रतिपादन केलं आहे. नागपुरातच ५ जून १९७३ रोजी श्रीगुरुजींनी देह ठेवला.

No comments:

Post a Comment