रा. स्व. संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार

हिंदुस्थानच्या म्हणजेच भारताच्या उज्ज्वल भवितव्यासाठी देशातील हिंदूंची मजबूत संघटना असणे आवश्यक आहे, तसेच भारत हे हिंदू राष्ट्र आहे यावर डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचा ठाम विश्वास होता. हिंदू राष्ट्राच्या या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्यांनी १९२५ मध्ये जी हिंदूंची सांस्कृतिक संघटना उभारली ती म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. विद्यमान महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश यांच्या सीमेवर असलेल्या निझामाबाद जिल्ह्यातील बोधन तालुक्यात १८८९ च्या गुढीपाडव्याला डॉ. हेडगेवार यांचा जन्म झाला. शालांत परीक्षा म्हणजे तत्कालीन मँट्रीक्युलेशन पास झाल्यानंतर केशवरावांना त्यांच्या थोरल्या बंधूंनी डॉ. बा. शि. मुंजे यांच्या मदतीने कोलकात्याला डॉक्टरकीच्या अभ्यासासाठी पाठविले. त्या ठिकाणी त्यांच्या संवेदनशील मनावर स्वामी विवेकानंद, वि. दा. सावरकर तसेच महर्षी अरविंद यांचा प्रभाव पडला. त्यातूनच पुढच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्वज्ञान किंवा सिद्धांत निर्माण झाले.
कोलकाता येथे असताना काही काळ ते ‘जुगांतर’ आणि अनुशीलन समिती यांसारख्या छुप्या क्रांतिकारी संघटनांच्या संपर्कात आले. मात्र त्यामुळेच त्यांचा क्रांतिकारक आणि त्यांच्या कार्याबद्दल भ्रमनिरास झाला. हिंदुस्थानसारख्या अवाढव्य देशात सशस्त्र क्रांती शक्य नाही याबद्दल त्यांची खात्री पटली. हिंदूंची पराभूत वृत्तीच त्यांच्या गुलामगिरीला आणि दैन्यावस्थेला कारणीभूत आहे, या निष्कर्षापर्यंत ते आले. यावर उपाय म्हणजे सांस्कृतिक चळवळ उभारून हिंदूंना संघटीत करणे आणि त्यांच्यात शिस्त आणि राष्ट्रीय भावना जागृत करणे हे त्यांनी जाणले. यातूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाची विचारसरणी निर्माण झाली. डॉ. हेडगेवार यांच्या या कार्याला डॉ. बा. शि. मुंजे आणि डॉ. ल. वि. परांजपे तसेच वि. दा. सावरकर यांचे पूर्ण आशीर्वाद लाभले. हे करत असताना ब्रिटिशांनी डॉ. हेडगेवार यांना दोनवेळा राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात डांबले पण वर्ष – सहा महिन्यातच सुटका देखील केली. या दरम्यान १९२५ च्या दसऱ्याला – विजयादशमी दिवशी, डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी आपले निकटवर्ती अप्पाजी जोशी; भय्याजी दाणी, बाबासाहेब आपटे आदींच्या उपस्थितीत रा. स्व. संघाची स्थापना केली. तेव्हापासून आजपर्यंत अनेक संकटांतून मार्ग काढत संघाची वाटचाल सुरु आहे, नागपुरात २१ जून १९४० रोजी त्यांचे निधन झाले.

No comments:

Post a Comment