Pages

नरेंद्र मोदींची गुजरात रियासत

‘नमो नमः’ हाच मंत्र गुजरातने तिस-यांदा आळवला आहे. केवळ आळवला आहे असे नाही तर त्या मंत्राचा आवाज वाढला आहे. कारण २००७ मध्ये ११७ जागा जिंकून दुस-यांदा मुख्यमंत्री झालेले नरेंद्र मोदी गुरुवारी ११९ जागा जिंकून तिस-यांदा अधिक बळ घेऊन मुख्यमंत्री होण्यास सज्ज झाले आहेत. भारतीय जनता पार्टीचा गुजरातमध्ये सलगपणे सत्तेवर येण्याची ही सहावी वेळ आहे. गुजरातमध्ये यावेळी निवडणूक एका वेगळ्या वातावरणात झाली होती. कारण परंपरागत ४० विधानसभा मतदारसंघ अस्तंगत होऊन मतदारसंघांची फेरआखणी निवडणूक आयोगाने केली होती.त्यामुळे काही राजकीय अभ्यासकांना प्रारंभी मोदी यांच्या भवितव्याबद्दल खात्री वाटत नव्हती. पण गुजरातमध्ये निवडणूक तपशिलाचे बारकावे ठाऊक असणारा मोदींएवढा जाणकार नेता दुसरा नाही. एकाच वेळी मोदी हे तेवढ्याच सक्षमपणे सर्व आघाड्यांवर व्यवस्थितपणे लढत होते. त्यांनी उभा केलेली प्रचार व संपर्क यंत्रणा आजच्या प्रगत भाषेत सांगायचे तर २४ बाय ७ म्हणजे दिवसाचे २४ तासही कार्यरत होती. किरकोळ लोकांशी किंवा स्थानिक प्रश्नांवर वाद न घालता नरेंद्र मोदी यांनी आपला राजकीय हल्ला सतत काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांंधी यांच्यावरच ठेवला. पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनाही त्यांनी प्रचार मोहिमेत फारसे महत्त्व दिले नाही. गुजरातमधील लोकांना शांतता, सुरक्षितता आणि विकास हवा आहे. त्यामुळे त्यावरच त्यांनी भर दिला. गुजरातची अस्मिता हा त्यांच्या प्रचाराचा एक प्रमुख मुद्दा होता. त्यावर सतत प्रकाशझोत ठेवून त्यांनी स्थानिक काँग्रेस नेत्यांना दिल्लीचे हस्तक ठरविले. आपल्या कार्यकाळात कधीही जातीय दंगल, धार्मिक दंगल किरकोळ स्वरूपातही झाली नाही हा त्यांचा मुद्दा बिनतोड होता. मोदींना मुस्लिमद्वेष्टे ठरविण्याची राष्ट्रीय मोहीम चालू असतानाच स्वतः मोदी यांनी गुजरातमधील अल्पसंख्य समाजाशी जवळीक साधली. त्यामुळेच मुस्लिम बहुल विभागातही नरेंद्र मोदी यांच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली. मोदी यांच्या व्यक्तिमत्त्वापुढे शंकरसिंग वाघेला आणि अन्य काँग्रेसनेते मुळीच प्रभावी वाटत नव्हते. केशूभाई पटेल हा फॅक्टर मोदी यांना सौराष्ट्रात त्रासदायक वाटत होता. पण मोदी यांनी त्यांच्या गुजरात परिवर्तन पार्टीलाही आटोक्यात ठेवले. काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे आणि उमेदवार न ठेवल्यामुळे दोन तरी जागांवर केशूभार्इंचे उमेदवार निवडून आले. नरेंद्र मोदी हे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार ठरतील काय याची चर्चा बराच काळ चालू आहे. आता गुजरातमध्ये विजयाची हॅटट्रिक केल्यामुळे मोदी यांची प्रतिमा इतरांच्या तुलनेत खूपच उजवी ठरली आहे. गुजरात निवडणूक खासदार राहुल गांधींच्या संयोजनाखाली होणार नाही असे आधीच काँग्रेसने जाहीर केले होते. त्याचा अर्थ स्पष्ट होता. बिहार व उत्तर प्रदेशनंतर राहुल गांधींच्या नावावर तिसरे मोठे अपयश नोंदले जाऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात होती. पण गुजरातमध्ये काँग्रेसला अनपेक्षितपणे यश मिळाले असते तर राहुल गांधींचे नाव श्रेयाच्या यादीत पहिले आले असते. त्यामुळे राहुल गांधी प्रचारात तरी उतरणार काय याबद्दल संभ्रम होता. पण श्रीमती सोनियाजी व राहुल गांधी हे दोघेही प्रचारात उतरले. त्यांच्या सभाही ब-यापैकी झाल्या. पण नरेंद्र मोदी यांच्या व्यक्तिगत जादूवर त्यांच्याकडे उतारा नव्हताच. नरेंद्र मोदी हे भाजपाचे पंतप्रधानपदाचे खरोखरच उमेदवार म्हणून घोषित होतील काय याची आजही खात्री नाही. याचे कारण म्हणजे भाजपामध्येही मोदी यांचे हितशत्रू खूप आहेत. ते राष्ट्रीय सरचिटणीस असताना त्यांना सहा वर्षे गुजरातबाहेर ठेवले होते. पंजाब व हरयाणाचे प्रभारी म्हणून त्याकाळी ते काम करीत होते. अटलबिहारी वाजपेयी यांनीच त्यांना पुन्हा एकदा गुजरातमध्ये पाठविले होते. पक्षात आणि पक्षाबाहेर अनेक शत्रू असतानाही मोदी टिकून आहेत हे महत्त्वाचे. भाजपाकडे पंतप्रधानपदाचे इच्छुक अनेक आहेत. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अद्यापही मोदी यांच्याबाबत अनुकूल नाही. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधानपदाचा मार्ग सोपा नाही. पण पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार असा गाजावाजा होणे मोदी यांना गुजरातमध्ये खूपच लाभदायक ठरले आहे. मोदी हे धूर्त राजकारणी असल्यामुळे हातचे सोडून किंवा मुख्यमंत्रिपद सोडून २०१४ च्या निवडणुकीत मुळीच उडी घेणार नाहीत. मात्र पक्षांतर्गत मोहीम करून ते आपले नाव १४ च्या निवडणूक निकालानंतरच पुढे आणू शकतात. शिवाय केंद्रात संयुक्त सरकारात पंतप्रधान होताना अन्य भागीदार पक्षांची ही अनुकूलता लागणार आहे. त्यामुळेच नरेंद्र मोदी हे कोणताही धोका पत्करतील असे वाटत नाही. पंतप्रधानपदाचे उमेदवार होण्यापेक्षा आपले नाव त्यासंदर्भात सतत चर्चेत ठेवणे हे नरेंद्र मोदींना अधिक लाभदायक ठरणार आहे. यापुढच्या काळात कदाचित अत्यंत आक्रमक बोलणारे पण अत्यंत सावधपणे कृती करणारे नरेंद्र मोदी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता अधिक आहे. म्हणूनच बहुधा गुजरातमध्ये त्यांचा वारसदार आज तरी कोणीही नाही.

No comments:

Post a Comment