हे पत्र तात्यारावांनी बाबांच्या मृत्युपूर्वी त्यांच्याकडे पाठविले होते आणि ते बाबांना वाचून दाखवण्यात आले होते. बाबांच्या दिव्य जीवनाचा समारोप करणारे ते अद्वितीय अमर पत्र असे.-
बाबा!
बाबा, आपल्या तिघा भावांचे जीवितकार्य एकरूप, एकजीव असेच होते. आपण आपल्या पिढीत आपल्या कुळाचे ऋण फेडले आहे. भारताच्या इतिहासातील एक अध्याय सुवर्णाक्षरांनी नोंदला गेलाच पाहिजे. "सावरकर युग" - शत्रूंनी तो शब्द रूढविला पाहिजे.
कर्तव्याच्या दृष्टीने कालच्या पत्रात लिहिले होते; पण फलाविषयी बोललो नव्हतो. कारण "मा फलेषु कदाचन." पण सापेक्षत: बोलावयाचे तर दोन वेळा उभ्या राष्ट्राचा जीवनप्रवाह प्रतीकुलाकडून अनुकुलाकडे आपण आपल्या सहकाऱ्यांसह उलटवून दिला आहे. "स्वातंत्र्यलक्ष्मी कि जय" ही पहिली क्रांती घोषणा आपली; व तिलाच पूर्तता देणारी "हिंदुस्थान हिन्दुओंका, नही किसीके बापका!" ही दुसरी क्रांती घोषणाही आपलीच! आपण दोन वेळा राष्ट्राची विचारक्रांती घडवून आणली आहे.
यात जे जे योद्धे लढले, रणी पडले, त्यात काहींची नावे दोन-चार दिवस लोक आठवतील; तर काहींचा लोकांना पत्ताही लागणार नाही. पण श्रेय दोघांचे समान, त्यातल्यात्यात पुतळा उभारावयाचा तो आपल्यासारख्या कर्माविरांचाच!
पहिली गोष्ट म्हणजे, आता अगदी हात धरून उभा असलेला मृत्यू हा शत्रू नसून मित्रासारखा भेटत आहे. आयुष्याचे सार्थक झाले. लहानपणी ज्या स्वातंत्र्ययुद्धाचे कंकण हाती बांधले ते यावज्जीव सोडले नाही. घनघोर यातना, दु:खे!- सुखही तसेच. इकडे अंदमानात तर तिकडे लाखो स्वजनांच्या जयघोषात हिमालयाच्या शिखराशिखरावर, काश्मीर, हरद्वार ते आसामपर्यंत फडकविलेला कीर्तिध्वज! पण घनघोर दु:खात तसेच सुखात याच कार्यी, त्याच हिंदुस्वातंत्र्याचा-क्रांतीचा ध्वज हातातून ढळला नाही. व्यक्तीच्या हातून जी शक्य ती सारी झुंज आयुष्यभर लढवली. तिशीच्या आतच फासाशी उभे राहावे लागले तरी झुंजतच राहिलो हे केवढे समाधान! "कर्मण्येवाधिकारस्ते" म्हणून फलाविषयी मी काहीच बोलत नाही.
जो स्वातंत्र्ययज्ञ आपण प्रथम चेतविला, तो आज राष्ट्रभर भडकलेला आहे. या आपल्यासारख्या सतत साठ वर्षे लढत असलेल्या वीराची काया जी पडेल ती मानवी काया नव्हे तर देवांच्या हातच्या वज्राची एक महान दिव्य समिधाच होय!
यासाठी ज्याचे परम सार्थक झाले त्या देहाची दिव्य समिधा आज आपल्या वैयक्तिक जीवनाची पूर्णाहुती म्हणून त्या, महान यज्ञात पद्धत आहे ही केवढ्या समाधानाची गोष्ट आहे. मित्र म्हणून भेटावयास आलेल्या त्या मृत्यूचे स्वागतच करू या "योगश्चीत्तवृत्तीनिरोध:" हे सूत्र आहे. चित्तवृत्ती निरोधन समाहित झालेल्या समाधीत, "आपुले मरण पहिले म्या डोळा, तो झाला सोहळा, अनुपम!" अशा समाधानाने आपला सारा जन्म जनार्दनाच्या सेवेत झीजविलेल्या, किर्तीनिरपेक्ष, केवळ कर्तव्यरत वीराला योगनिद्रेत-सुख समाधीत विलीन होण्याचा अधिकार आहे.
पूर्वी विशी-तिशी, चाळीशीमध्ये वारंवार मृत्यूची गाठ पडली होती. तेव्हाही आपण त्याचे स्वागत केले. पण ते काहीसे आव्हानाच्या स्वरुपात होते. "येतोस तर ये, कोण भितो तुला?" असा ध्वनी त्या वेळच्या सिद्धतेचा होता. आज प्राकृत संसारात ज्यांना सुखे, सार्थकता म्हणतात तीही सुटलेल्या काळाने आपल्याभोवती विखुरलेली आहेत. स्वजन, आप्तेष्ट पुन्हा भेटले, कारागारात जी कार्यपिपासा अपुरी राहिली होती ती आज भारतखंडभर झालेल्या युगप्रवर्तक कार्याच्या व्यापात सिंधू, गंगा-यमुना ते दक्षिणसिंधूपर्यंत सर्व पवित्र नद्यांचे प्रत्यक्ष जल पिऊन शांत होत आहे. घरी, दारी, मुले हसत खेळत आहेत. आता मृत्यू आला तर आपण होऊन महाप्रस्थानाला निघायची घडी भरली. यास्तव समाधानाने, मित्राचा जसा हात धरायचा तसाच मृत्यूचा! आव्हानाने नव्हे तर आनंदाने! ज्यात मागे किंवा पुढे उरलेले नाही, तृषा तृप्त झाल्या, एका झटक्या-सरशी जगाची वार्ता, लोभ, क्षोभ, संबंध नाहीसे होऊन शांतता उरली, "मी" देखील नाहीसा झाला, त्या अनंतात हे कर्मवीरा, आता पूर्ण समाधानाने विलीन व्हावे.
ओम शांति! शांति!! शांती!!!
तात्या
मुंबई १४-३-१९४५
टीप: बाबांचे निधन १६-३-१९४५ ला सांगली येथे झाले.
No comments:
Post a Comment